Ticker

6/recent/ticker-posts



स्वप्नील माकोडे 

ग्रामीण प्रतिनिधी राळेगाव 

हुकूमत भी किसानों पे गजब के एहसान करती है,आँखें छीन लेती है और चश्मे दान करती है…या ओळींतील उपरोध जसा सत्तेच्या निर्णयांवर भाष्य करतो, तसाच सूर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाकडे पाहताना अनेकांच्या मनात उमटताना दिसत आहे. राज्य विधानसभेने नुकतेच महिलांना स्वतंत्र ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर ओळख देणारे विधेयक मंजूर केले आहे. या निर्णयाचे स्वागत होत असले तरी, केवळ कायदेशीर ओळखीमुळे महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांचे निराकरण होणार का, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळाल्याने कृषी क्षेत्र अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल.मात्र, दुसरीकडे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. देशाचा कणा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च, हमीभावाचा प्रश्न आणि आत्महत्यांसारख्या गंभीर समस्या कायम असताना, केवळ ‘शेतकरी’ ही ओळख मिळाल्याने महिलांच्या आयुष्यात किती बदल घडेल, याबत साशंकता व्यक्त होत आहे.

महिलांना शेतकरी म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नावावर कर्ज, अनुदाने, पीक विमा, सरकारी योजनांचा थेट लाभ, जमिनीवरील हक्क आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, स्वतःच्या मालकीची शेती नसलेल्या शेतमजूर महिलांच्या आयुष्यात या कायद्याचा नेमका काय परिणाम होईल, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.महिलांवरील अत्याचार, रोजगार, उत्पन्नातील असमानता आणि शेतीतील श्रमाला या मुळे प्रतिष्ठा मिळणार आहे का याचे उत्तर कुणाकडेच नाही.

आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीचा हा अपमान नव्हें का यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही दुर्दैवी ओळख राळेगाव तालुक्याच्या वाट्याला ही आली आहे. नापिकी कर्जबाजारीपणा व कमी बाजारभावामुळे इथे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अलीकडच्या दशकभरात तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला. शेती व्यवसाय याला कारणीभूत ठरला आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला कुटुंबाचा पूर्णभार सांभाळावा लागतो , अशा परिस्थितीत त्या कुटुंबातील महिलेला केवळ शेतकरी हा कायदेशीर दर्जा देऊन आपण काय साध्य करणार.