प्रतिनिधी:/गणेश जाधव जामनेर.
मुक्या प्राण्यांबद्दलची कृतज्ञता आणि मानवी संवेदनेचे एक अत्यंत अनोखे आणि हृदयस्पर्शी उदाहरण जामनेर तालुक्यातील भराडी येथे समोर आले आहे. शेतातील आपसातील भांडणात मृत पावलेल्या एका माकडावर गावकऱ्यांनी केवळ मानवाप्रमाणे अंत्यसंस्कारच केले नाहीत, तर आज शनिवारी (दि. १८ जुलै) त्याचा 'अकरावा विधी' (उत्तरकार्य) संपूर्ण गावाने एकत्र येत अत्यंत भावूक वातावरणात संपन्न केला. या निमित्ताने संपूर्ण गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे (गावपंगत) आयोजन करण्यात आले होते.
🔹 शेतातील भांडणात एका माकडाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, ११ दिवसांपूर्वी मौजे भराडी येथील एका शेतामध्ये दोन माकडांमध्ये आपसात जोरदार भांडण झाले होते. या जीवघेण्या लढाईत दोन्ही माकडं गंभीर जखमी झाली. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने एका माकडाचा जागीच मृत्यू झाला होता.
गावकऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनरक्षकांनी तातडीने गावात दाखल होत जखमी माकडाला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
🔹 हनुमान मंदिर परिसरात दिली समाधी
मृत पावलेल्या माकडाला 'हनुमान रूप' मानून गावकऱ्यांनी धार्मिक भावना जपत त्याची मानवाप्रमाणे रीतसर अंत्ययात्रा काढली. गावातील हनुमान मंदिर परिसरात या माकडाचे दफन करून त्याला समाधी देण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी गावातील संजय महाराज न्हावी (चोपदार) यांनी धार्मिक परंपरेनुसार माकडाला पाणी देऊन अंतिम संस्कार पार पाडले.
🔹 संपूर्ण गाव सरसावले; विनामूल्य सेवा देत जपली भूतदया
या घटनेला ११ दिवस पूर्ण झाल्याने आज भराडी ग्रामस्थांनी एकत्र येत श्राद्ध कर्म आणि अकराव्याचा विधी पार पाडला. हा धार्मिक विधी यशस्वी करण्यासाठी गावाने एकीचे दर्शन घडवले. यामध्ये प्रामुख्याने:
पोलीस पाटील संभाजी पाटील सरपंच विजयाबाई पाटील व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य. व कर्मचारी.आणि गावातील सत्यवान पाटील, समाधान पाटील, नवल काकडे, अरुण पाटील, ईश्वर पाटील, दगडू पाटील, पद्माकर पाटील, अनिल पाटील, ईश्वर खोडपे, हिराजी पाटील, भिवराव पाटील, सुरेश ढवणे, भावेश वडर, विशाल धनगर, रोहन पाटील, अविनाश खोडके, निलेश पाटील, विशाल पाटील, दीपेश पाटील आणि अशोक पाटील यांच्यासह सर्वच ग्रामस्थांनी स्वतःच्या घरचे कार्य असल्यासारखा पुढाकार घेतला.
विशेष सहकार्य:
या विधीचे औचित्य साधून गावातील दीपक न्हावी, बापू न्हावी आणि सुनील न्हावी यांनी गावकऱ्यांचे मुंडण करण्याची सेवा पूर्णपणे विनामूल्य दिली. तसेच, महाप्रसादासाठी लागणारे पिण्याचे शुद्ध ॲक्वा पाणी विशाल पाटील यांनी मोफत उपलब्ध करून दिले.
मुक्या प्राण्याप्रती भराडी गावकऱ्यांनी दाखवलेली ही भूतदया, संवेदनशीलता आणि सामाजिक एकोपा सध्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.






Social Plugin