Ticker

6/recent/ticker-posts

मानवतेची मशाल तेवत ठेवली! आषाढी वारीत सुवर्ण परिस स्पर्श फाऊंडेशनचा सेवाभावी उपक्रम



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]  

आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समता आणि मानवतेचा संदेश देणारी पवित्र परंपरा आहे. या वारीत लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण येथील सुवर्ण परिस स्पर्श फाऊंडेशनने निस्वार्थ सेवाभावाचा आदर्श समाजासमोर ठेवला.

फाऊंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, स्वच्छ स्नानगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहा, प्राथमिक आरोग्य तपासणी तसेच विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधांचा लाभ मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी घेतला.

"सेवाच खरी पूजा आणि माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म" या भावनेतून फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र सेवा बजावली. जात, धर्म, पंथ, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न करता प्रत्येक वारकऱ्याला सन्मानाने सेवा देण्यात आली.

यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण म्हणाल्या, "समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर माणसाच्या मनातील माणुसकी जागृत करावी लागते. आमचा उद्देश केवळ सेवा करणे नसून संवेदनशील, सुसंस्कृत आणि जबाबदार समाज घडविण्याचा आहे."

या सेवाभावी उपक्रमातून सुवर्ण परिस स्पर्श फाऊंडेशनने समाजसेवा हीच खरी लोकसेवा असल्याचा संदेश दिला. महिलांच्या सक्षमीकरणापासून ते गरजूंना आधार देण्यापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांमुळे फाऊंडेशनने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शितल भोसले, अनिता जाधव, रेश्मा कवितके, सना कोतवाल, साक्षी घनवट आणि आरती खेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या समाधानामुळे आणि दिलेल्या आशीर्वादामुळे फाऊंडेशनच्या सेवाकार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.