महाराष्ट्र ग्रामीण न्यूज अहिल्यानगर प्रतिनिधी : शरद धाडगे
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे ११ वर्षीय मतीमंद शाळकरी विद्यार्थ्यावर कथित लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज दि 23जुलै 2026 रोजी खरवंडी येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावकऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पीडित विद्यार्थ्याला तातडीने न्याय मिळावा, प्रकरणाची जलदगतीने सुनावणी व्हावी आणि चार्जशीट लवकर दाखल करण्यात यावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच दोषीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
मोर्चानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली. या सभेत दोषीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. "मुलांचे सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि निर्भय बालपण ही समाजाची सर्वोच्च जबाबदारी आहे. अशा अमानुष कृत्यांविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे," असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.
या घटनेमुळे महाराष्ट्रातील लहान मुले व महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अशा अमानुष कृत्यांवर आळा घालण्यासाठी शासनाने अधिक कठोर पावले उचलावीत आणि दोषींना तातडीने कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या निषेध मोर्चामध्ये हिंदू धर्मरक्षक श्री. ऋषिकेशभाऊ शेटे, हिंदू धर्मरक्षक श्री. अविनाशभाऊ बनकर, श्री. ललितदादा मोटे (पा.), रामराज्य उत्सव समिती, नेवासा तसेच सकल हिंदू समाज, महाराष्ट्र राज्य यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धनवटे तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
—





Social Plugin