बुध दि (प्रकाश राजेघाटगे) :
संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा मानाचा पुरस्कार फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांना प्रदान करताना मनापासून आनंद होत असल्याचे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. पुसेगाव (ता. खटाव) चे सुपुत्र असणाऱ्या डॉ. वसंत वाघ यांच्या या गौरवामुळे पुसेगावसह संपूर्ण खटाव तालुक्यातून अभिमान व्यक्त केला जात आहे.
संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. वसंतराव वाघ यांना भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ 'डॉ. जयंत नारळीकर पुरस्कारा'ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याच्या व्यासपीठावर खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. के. सिन्हा, डॉ. संजय चाकणे, डॉ. प्रसाद खंडागळे, प्राचार्य उद्धवराव घाडगे, उत्तम कुमार इंदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. वसंत वाघ भावूक झाले. "माझ्या आयुष्याची यशस्वी वाटचाल ही केवळ आणि केवळ शिक्षण, ज्ञान व निष्ठा यावरच आधारित राहिली आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमा दरम्यान संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिता राजे पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "डॉ. वसंत वाघ हे एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अतिउच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे आम्हा सर्व कुटुंबीयांना व ग्रामस्थांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो."
या गरिमामय पुरस्कार वितरण सोहळ्यास निवृत्त उपायुक्त के. एस. पवार, प्रसिद्ध लेखक दिनेश फडतरे, नितीन जाधव, रमेश फडतरे, अविनाश फडतरे, प्रा. कैलास काटकर, बाबुराव साळुंखे, ज्ञानदेव साळुंखे, माधुरी जयदीप ननावरे, सागर फडतरे यांच्यासह शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुसेगावच्या सुपुत्राने मिळवलेल्या या बहुमानाबद्दल सर्वस्तरातून डॉ. वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Social Plugin