नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी गौरव ब्राम्हणवाडे
, दि. १८ जुलै : अमरावती–यवतमाळ मार्गावरील शिंगणापूर फाटा येथे सर्व सुपरफास्ट, शिवशाही व शिवाई बसांना अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला असून, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम परळीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभाग नियंत्रकांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत.
शिंगणापूर फाटा येथे अधिकृत बसथांबा नसल्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक वर्षांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन शुभम परळीकर यांनी एसटी प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करत सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याची दखल घेत अमरावती विभाग नियंत्रकांनी १८ जुलै २०२६ रोजी आदेश जारी करून अमरावती विभागातील सर्व संबंधित सुपरफास्ट, शिवशाही व शिवाई बसांना शिंगणापूर फाटा येथे अधिकृत थांबा देण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व चालक व वाहकांनी या ठिकाणी प्रवाशांना सुरक्षितपणे चढ-उतार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी व आदेशाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे शिंगणापूर व परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम परळीकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत.





Social Plugin