तातडीने पंचनामे करून भरपाईची आमदार दौलत दरोडा यांची मागणी
शहापूर (ठाणे )| प्रफुल्ल शेवाळे :
शहापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती, बागायती तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनामार्फत आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शहापूर विधानसभा आमदार तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) दौलत दरोडा यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार दरोडा यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी शहापूर तालुक्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे भातशेती, बागायती पिके, घरे व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
शेतकरी हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असल्याने झालेल्या नुकसानीमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाच्या नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार दरोडा यांनी निवेदनातून केली आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी प्रशासनाकडे आग्रहाने नमूद केले आहे. शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





Social Plugin