Ticker

6/recent/ticker-posts

समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणास किन्होळ्यात उत्साहात प्रारंभ


 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण: ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर

मन्सूर शहा धोत्रा .भंनगोजी चिखली.:-----

बुलढाणा,दि.17 (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार, सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) उपक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

जिल्हा परिषद बुलढाणा व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धुतडमल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका तसेच विविध आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणादरम्यान माता व बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, मानसिक आरोग्य सेवा, आपत्कालीन आरोग्य सेवा, योग व आयुष उपचार पद्धती, आरोग्य संवर्धन, प्रभावी संवाद कौशल्य तसेच समुदाय सहभाग आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रशिक्षक म्हणून डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनिता जवंजाळ आणि सुलोचना पर्हाड हे विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांनी सांगितले की, "समग्र प्राथमिक आरोग्य सेवा ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करणारी संकल्पना आहे. या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपचार मिळाल्याने उच्चस्तरीय रुग्णालयांकडे होणाऱ्या अनावश्यक संदर्भांमध्येही घट होईल."

प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू इंगळे, डॉ. बुशरा, आरोग्य सहाय्यक सचिन चिंचोले, विजय जाधव, आरोग्य सहायिका वर्षा डाबेराव, कल्पना परिहार तसेच रमेश ढवळे, कुलदीप सावळे, वैशाली मगर, सुनील कस्तुरे, लक्ष्मण मलवार आणि श्रीकांत वानखेडे यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि आशा स्वयंसेविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

प्राथमिक स्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांच्या गावातच सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.