Ticker

6/recent/ticker-posts

सेगाव-कोरेगाव रस्त्यावर भारत पेट्रोलियमजवळ फॉर्च्युनर आणि बोलेरोची समोरासमोर भीषण धडक; दोन्ही गाड्या उलटल्या, महिला किरकोळ जखमी





बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव-कोरेगाव रस्त्यावरील रत्नदीप हॉटेल आणि भारत पेट्रोलियम पंपाजवळ आज संध्याकाळच्या सुमारास फॉर्च्युनर आणि बोलेरो या दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून, बोलेरो गाडीतील काही महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

*ओव्हरटेक करताना झाला अपघात*

मिळालेल्या माहितीनुसार, बोथे (तालुका माण) येथील फॉर्च्युनर गाडी (क्रमांक MH 46 W 0999) ही कोरेगाव दिशेकडून पुसेगावच्या दिशेने जात होती. दरम्यान, ही फॉर्च्युनर गाडी दुसऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना, पुसेगाव बाजूकडून कोरेगावच्या दिशेने उंडाळे येथे चाललेली बोलेरो गाडी (क्रमांक MH 09 CM 5497) समोर आली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात फॉर्च्युनरने समोरील बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली.

*वाहनांचे प्रचंड नुकसान, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार*

धडक एवढी तीव्र होती की दोन्ही वाहने रस्त्याकडेला उलटली. यामध्ये दोन्ही गाड्यांचा पुढील व बाजूचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले.

या अपघातात बोलेरो गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने पुसेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पुसेगाव पोलीस स्टेशन पोलीस उपस्थित होते.