Ticker

6/recent/ticker-posts

राळेगाव तालुक्यातील आष्टा गावातील सिमेंट रस्त्यावरील रपटा निखळला, ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी

 


स्वप्नील घोटेकार ग्रामीण प्रतिनिधी राळेगाव 

*राळेगाव.* तालुक्यातील मौजा आष्टा नवीन वस्ती येथील सिमेंट रस्त्यावरील रपटा पूर्णपणे निखळल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बैलगाडी आणि चारचाकी वाहने नेणे अशक्य झाले असून, रस्त्यावरील खड्डे आणि उघड्या नाल्यांमुळे बैलांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती राळेगाव यांना निवेदन देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 

आष्टा नवीन वस्ती येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील सिमेंट रस्त्यावरील रपटा ट्रॅक्टर आणि इतर जड वाहनांमुळे पूर्णपणे निखळला आहे. त्यामुळे रस्त्याच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत आणि नाली खोलगट झाली आहे. 

पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे. बैलगाडी नेण्यास मोठी अडचण निर्माण होत असून, रपट्यामुळे बैलांचा पाय नालीत जाऊन जखमी होण्याची शक्यता आहे. चारचाकी वाहनेही या मार्गावरून जाऊ शकत नाहीत.

ग्रामस्थांनी याबाबत यापूर्वीही ग्रामपंचायत कार्यालय आष्टा यांना तोंडी तक्रार दिली होती, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता थेट पंचायत समितीला निवेदन देऊन संबंधित ग्रामपंचायतीला दुरुस्तीचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.


ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने रपट्याची दुरुस्ती झाली नाही आणि यामुळे कोणत्याही नागरिकाच्या किंवा बैलाच्या जीवितास धोका पोहोचला, तर त्यास संबंधित ग्रामपंचायत जबाबदार राहील.