Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आळे येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक उत्साहात संपन्न

 




पत्रकार नाव मयुर भुजबळ @पुणे जिल्हा प्रतिनिधी

आळे, दि. १७ जुलै २०२६ : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आळे येथे (हेड बॉय व हेड गर्ल )पदासाठीची विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या निवडणुकीत इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला. मतदान केंद्रावर शिस्तबद्ध, पारदर्शक व आदर्श पद्धतीने मतदानाची संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली.

या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष नेताजी (दादा) सुरेश डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न अण्णा डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली शेठ कुऱ्हाडे, संस्थेचे सचिव दिलीप आप्पा वाव्हळ, अ‍ॅड. दत्तात्रय विठ्ठल भागवत, पांडुरंग शेठ वाकचौरे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधीर शेठ वाव्हळ यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुपारी निकालाची घोषणा मोठ्या उत्साहात करण्यात आली. हेड बॉय म्हणून रोशन वाघ यांची, तर हेड गर्ल म्हणून स्वरा काकडे यांची निवड झाल्याचे जाहीर होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात व जल्लोषात विजेत्यांचे स्वागत केले. नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यालयाच्या शिस्त, गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी निवडणूक अधिकारी मोहन हांडे सर यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांना सुपरवायझर मेघशाम बेदरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे प्राचार्य गुलाब बोऱ्हाडे सर यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना जबाबदार, जागरूक आणि आदर्श नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांनी शिस्त, उत्साह आणि लोकशाही मूल्यांचा आदर राखत सहभाग नोंदविल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी, पारदर्शक आणि आदर्शवत वातावरणात संपन्न झाली.