Ticker

6/recent/ticker-posts

कारंज्यात गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व गुरुजनांचा भव्य गौरव सोहळा आयोजीत.



गुणवंत राठोड कारंजा लाड - प्रतिनिधी

कारंजा : कारंजा तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत आपल्या-आपल्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या माता-पित्यांचा तसेच त्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या गुरुजनांचा भव्य गौरव सोहळा शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता श्री बाबासाहेब धाबेकर सभागृह, कारंजा लाड येथे आयोजीत केला आहे.

हा प्रेरणादायी उपक्रम महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कारंजा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, अदिती अर्बन को-ऑपरेटिव्ह पत संस्था बुलढाणा शाखा कारंजा तसेच अस्थिरोग तज्ञ डॉ. पंकज काटोले मित्र मंडळ, कारंजा-मानोरा यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून दहावी व बारावीमध्ये आपल्या शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या माता-पित्यांचा आणि त्यांना घडविणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेला ग्रामीण तथा शहरी भागात प्रोत्साहन मिळावे, पालक व शिक्षकांच्या योगदानाचा गौरव व्हावा आणि समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. त्याच परंपरेचा भाग म्हणून यावर्षीही हा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा उपक्रम भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक महाभूमीचे संपादक तथा अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुरेशभाऊ देवकर राहणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून पंकज काटोले मित्र मंडळ कारंजा मानोरा चे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पंकज काटोले उपस्थित राहतील. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, तहसीलदार रवि महाले, पोलीस निरीक्षक अमर चोरे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, प्राचार्य आर. एम. पाटील,अधिकारी अमित शिंदे, गिरीश जतकर तसेच महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंधुभाऊ इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या यशामागे खंबीरपणे उभे राहिलेल्या माता-पित्यांचा आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांचा सत्कार नसून शिक्षण, संस्कार आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे.


या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा सचिव रामदास मिसाळ, तालुका अध्यक्ष आरीफ पोपटे व शहराध्यक्ष संदीप कुऱ्हे हे तथा सर्व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य यांनी केले आहे.