Ticker

6/recent/ticker-posts

कल्याण–कसारा रेल्वे स्थानकांवरील धोकादायक प्लॅटफॉर्म गॅपची दखल;



 सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाची हालचाल

 प्रफुल्ल शेवाळे(विशेष प्रतिनिधी)

कल्याण–कसारा रेल्वे मार्गावरील काही स्थानकांवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डब्यांमधील वाढलेले अंतर प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना चढ-उतरण्यावेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या समस्येची दखल घेतली असून संबंधित विभागांकडून स्थानकांची पाहणी व तांत्रिक माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आणि डब्यांमधील अंतर अधिक आहे, त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेलफेअर असोसिएशन ने या विषयावर आवाज उठवत रेल्वे प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्लॅटफॉर्मची रचना, गॅप कमी करणे, प्रवाशांसाठी सूचना फलक लावणे तसेच सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

रेल्वे प्रशासनाकडून स्थानकनिहाय पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित हा प्रश्न असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

"धोकादायक प्लॅटफॉर्म गॅप कमी झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल," अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव उमेश विशे आणि अध्यक्ष जगदीश धनगर यांनी विशेष करून सातत्याने या विषयी रेल्वे कडे पाठपुरावा केला आहे.