Ticker

6/recent/ticker-posts

कटगुण फाट्यावर भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा ते पंढरपूर रोडवरील कटगुण फाटा (ता. खटाव) येथे एका भरधाव अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ६३ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार, दि . ३० जून रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडला. अधिक बजरंग जावळे (वय ६३ वर्ष) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

याप्रकरणी सागर अधिक जावळे (वय ३३ वर्ष, रा. कटगुण, ता. खटाव, जि. सातारा) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुसेगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी

फिर्यादी सागर जावळे हे मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास सातारा ते पंढरपूर रस्त्यावरील कटगुण फाट्यावरून त्यांच्या बजाज मोटरसायकलने (क्रमांक MH 11 CP 8727) जात होते. याच वेळी एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी (कार) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हलगर्जीपणाने आणि भरधाव वेगात चालवले.


या कारने प्रथम सागर जावळे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका बजाज मोटरसायकलला (क्रमांक MH 11 ED 4668) समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले. अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे फिर्यादीचे वडील अधिक बजरंग जावळे यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर कार चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५४/२०२६ नुसार करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) आणि मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), १३४(ब), १८४ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. जी. एन. खुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एल. वाघमारे पुढील तपास करत आहेत. पोबारा केलेल्या अज्ञात कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.