प्रतिनिधी अनिकेत चांदणे
वाडेगाव (प्रतिनिधी): वाडेगाव आणि परिसरातील सुमारे एक लाख लोकसंख्येला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाप्रमुख रेखाताई संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेना शहर प्रमुख शितल योगेश कंडारकर यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, जेणेकरून तिथल्या सुविधा अधिक सक्षम होतील, ही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मांडली.
उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत शितल कंडारकर यांनी वाडेगावच्या लोकसंख्येचा विचार करून आरोग्य सुविधेची नितांत गरज असल्याचे सांगितले. वाडेगावची स्वतःची लोकसंख्या ३५ हजार असून, आजूबाजूच्या गावांचा विचार करता ही संख्या एक लाखाच्या वर जाते. केंद्रीय आरोग्य मानकांनुसार (IPHS 2022) एवढ्या लोकसंख्येसाठी 'ग्रामीण रुग्णालय/सामूहिक आरोग्य केंद्र' (CHC) असणे गरजेचे आहे.
यामुळे सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ते २४x७ कार्यरत असणारे 'उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय' स्तरावर नेणे आवश्यक आहे. या रुग्णालयात खालील सुविधा असणे गरजेचे आहे:
२४x७ आपत्कालीन व प्रसूती सेवा: रात्री-अपरात्री येणाऱ्या वैद्यकीय आपत्तींसाठी रुग्णालय उघडे राहावे. यात सुसज्ज प्रसूती गृह आणि नवजात शिशु संगोपन युनिट आवश्यक आहे. अपघात, विषबाधा, सर्पदंश आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर प्रसंगात रुग्णाला स्थिर करण्यासाठी आपत्कालीन सेवा उपलब्ध असावी.
बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि तज्ज्ञ सल्ला: रोज शेकडो रुग्णांच्या तपासणीसाठी सामान्य ओपीडी सुरू असावी. आठवड्यातून किमान निश्चित दिवशी स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि दंतरोगतज्ज्ञ यांच्या विशेष ओपीडी असाव्यात. आयुष (AYUSH) विभागही सुरू करणे आवश्यक आहे.
मोफत निदान आणि प्रयोगशाळा: रक्त, लघवी, क्ष-किरण (X-Ray), ईसीजी (ECG) अशा ६३ प्रकारच्या चाचण्या मोफत उपलब्ध असाव्यात. टीबी निदानासाठी स्वतंत्र केंद्रही गरजेचे आहे.
औषध पुरवठा आणि फार्मसी: १७२ प्रकारची अत्यावश्यक औषधे आणि सर्पदंशावरील लस पुरेसा साठा असावा. रुग्णांना औषधांची यादी स्पष्ट दिसावी यासाठी केंद्राबाहेर फलक लावला जावा.
खाटांची उपलब्धता: तात्पुरते दाखल करून घेण्यासारखे रुग्ण, सलाईन लावणे किंवा प्रसूतीनंतर मातांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी १० ते १५ खाटांचा वॉर्ड असावा.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व लसीकरण: गरोदर माता आणि बालकांसाठी दर आठवड्याला नियमित लसीकरण सत्र असावे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तपासणी व समुपदेशन व्हावे.
शितल कंडारकर यांनी या निवेदनात स्पष्ट केले की, वाडेगावची मोठी लोकसंख्या पाहता, तांत्रिकदृष्ट्या या प्राथमिक आरोग्य केंद्राला 'ग्रामीण रुग्णालय' (CHC) मध्ये रूपांतरित करणे योग्य ठरेल. जेणेकरून तिथे ३० खाटांचे रुग्णालय, शस्त्रक्रिया गृह (OT) आणि कायमस्वरूपी ४ तज्ज्ञ डॉक्टरांची पदे मंजूर होतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत, योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीनंतर वाडेगावच्या आरोग्य सेवेत लवकरच मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवेदन देतेवेळी अकोला महानगरप्रमुख निशा ग्यारल पातुर तालुका प्रमुख सपना नवले श्रमिक कामगार सेना जिल्हाध्यक्ष माधुरी वाघमारे अकोला जिल्हा समन्वयक स्वानंदी पांडे अकोला शहर प्रमुख जयश्री धारपवार ह्या शिवसेना महिला आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या





Social Plugin