![]() |
छायाचित्र -: सातारा : जिल्हा परिषदेत डॉ. प्रिया शिंदे, याशनी नागराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि पुसेगाव-काटकरवाडी ग्रामस्थांची बैठक पार पडली. |
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव-काटकरवाडी सरहद्दीवर श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या मालकीच्या जागेत होत असलेल्या आदर्श व पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा निर्धार प्रशासकीय अधिकारी, पुसेगाव-काटकरवाडी ग्रामस्थांनी बैठकीत केला.
सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुसेगाव-काटकरवाडी येथील ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला जेष्ठ नेते डॉ. सुरेश जाधव, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, पुसेगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विशाल जाधव, ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त संतोष जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रज्ञा माने, कार्यकारी अभियंता चक्के, गटविकास अधिकारी योगेश कदम, विस्तार अधिकारी बोइनवाड, ग्रामविकास अधिकारी ए. जे. नागरगोजे, सोनवणे, इंगळे व दोन्ही गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
याशनी नागराजन म्हणाल्या, पुसेगाव येथे होत असलेल्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) प्रकल्पात प्लॅस्टिक व इतर सुका कचरा आणून त्याचे वर्गीकरण करून पुनर्वापरासाठी देण्यात येणार आहे. येथे इतर कोणताही कचरा आणला जाणार नाही. त्यामुळे प्रदूषण, अस्वच्छता, आरोग्य अशा अडचणी उद्भवणार नाहीत. तसेच पुसेगाव ग्रामपंचातीने कुटुंब स्तरावर कचरा विलगीकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आणि ओल्या कचऱ्याच्या वेगळ्या नियोजनाबाबत नागराजन यांनी सूचना केल्या.
डॉ. प्रियाताई शिंदे यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल काटकरवाडी ग्रामस्थांचे अभिनंदन करून स्वच्छता विषयक उपक्रमासाठी आवश्यक बाबींची मागणी आल्यास त्याची पूर्तता करण्याची हमी दिली.
पुसेगाव ग्रामपंचायतीकडून प्रत्येक कुटुंबास ओला व सुका कचरा साठवण्यासाठी दोन वेगवेगळ्या कचराकुंड्या (डस्टबीन) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुका कचरा एमआरएफ प्रकल्पासाठी जाईल. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी ऑरगॅनिक वेस्ट कम्पोजर (ओसीएम) मशीन घेण्याचे नियोजन केले आहे. हे मशीन तसेच नडेप व बायोगॅस यांच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया पुसेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत केली जाणार असल्याची माहिती पुसेगाव ग्रामपंचायतीने दिली.
दरम्यान, कार्यक्षेत्रातील नागरिक आणि सर्व व्यावसायिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पुसेगाव ग्रामपंचायतीने काटकरवाडी ग्रामस्थांना आरोग्यविषयक त्रास होणार नाही याची लेखी हमी दिली जाणार आहे.
*श्री सेवागिरी ट्रस्ट करणार जनजागृती*
ओला आणि सुका कचरा वेगळा करणे (कचरा वर्गीकरण) ही स्वच्छता आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. यासाठी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट घरोघरी विविध उपक्रमांद्वारे ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती करणार आहे. सुवर्णनगरी पुसेगावच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अपेक्षित असल्याची भावना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.





Social Plugin