Ticker

6/recent/ticker-posts

"साहेब, मी जिवंत आहे! मला कागदोपत्री मयत करू नका!"



जिवंत नागरिकाला कागदोपत्री ठरवले ‘मयत’;बिरोबाचीवाडीत बीएलओच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश

पाटस प्रतिनिधी:गणेश गावडे 

दौंड:निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना, दौंड तालुक्यातील बिरोबाचीवाडी (पाटस) येथे प्रशासनाचा अत्यंत भोंगळ आणि बेजबाबदार कारभार समोर आला आहे. येथील बीएलओ तथा ग्रामसेविका सुरेखा संजय सोनवणे यांनी चक्क एका जिवंत नागरिकाला कागदोपत्री 'मयत' दाखवून त्याचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा गंभीर प्रकार केला आहे. बिरोबाचीवाडी येथील रहिवासी श्री. हौशीराम आबुराव काळे (वय ३८) हे स्वतः जिवंत असताना, बीएलओने त्यांच्या एसआयआर (SIR) गणना प्रपत्रावर निळ्या पेनने 'मयत' असा शेरा मारून टिक केले होते. जेव्हा हौशीराम काळे यांना या प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी स्वतः बीएलओ यांच्याकडे जाऊन "मी जिवंत आहे, माझा फॉर्म मला द्या" असे सांगत आपला फॉर्म आणि आधार कार्ड दाखवून बीएलओचा हा पराक्रम उघडकीस आणला.

याआधीही बिरोबाचीवाडीतील ग्रामस्थांनी व पत्रकारांनी बीएलओ सुरेखा सोनवणे आणि शिपाई सुजित काळे यांच्या मनमानी कारभाराबाबत गट विकास अधिकारी (BDO), तहसीलदार दौंड, जिल्हाधिकारी पुणे आणि मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) मुंबई यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. १५ जुलैपासून ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज बंद करून नागरी सुविधा ठप्प करण्यात आल्या आहेत. याबाबत विचारणा केली असता बीएलओने पत्रकारांना व ग्रामस्थांना "तुमचे काम करणार नाही, काय करायचे ते करा" अशी उघड धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. बाधित नागरिक हौशीराम काळे यांनी व्यथा मांडताना सांगितले की, माझ्याच गावात मला कागदोपत्री मारून टाकले आहे, जर मी स्वतः जाऊन माझा फॉर्म आणला नसता, तर माझे नाव मतदार यादीतून कायमचे वगळले गेले असते. जिवंत व्यक्तीला 'मयत' दाखवणे हा केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांचा घटनात्मक मतदानाचा हक्क हिरावण्याचा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे बीएलओ सुरेखा सोनवणे यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम ३२ अन्वये तात्काळ कडक शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी, तसेच बिरोबाचीवाडीसाठी नवीन निष्पक्ष बीएलओची नियुक्ती करावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थ व पत्रकारांनी प्रशासनाकडे केली आहे.

"मी रोज रोजगारासाठी एमआयडीसीत कामाला जातो. बीएलओचे काम हे घरोघरी जाऊन फॉर्म देण्याचे असताना, त्यांनी माझ्या घरी न येता परस्पर माझ्या फॉर्मवर 'मयत' असा शेरा मारला. मला फॉर्म का मिळत नाही म्हणून मी कामावरून सुट्टी काढून ग्रामपंचायतीत गेलो, तेव्हा मी कागदोपत्री 'मयत' असल्याचे समजताच मला धक्का बसला! मी जर स्वतः जाऊन तो फॉर्म आणला नसता, तर माझे नाव मतदार यादीतून कायमचे गायब झाले असते. माझ्याच गावात मला कागदोपत्री मारणाऱ्या अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई केलीच पाहिजे!"— हौशीराम आबुराव काळे (बाधित नागरिक, बिरोबाचीवाडी)