Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत पास्थळ हद्दीतील MSEB पंपाच्या गेटसमोर साचलेल्या पाण्यामुळे डिझेल-पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्यांची कसरत; वाढली गैरसोय, अपघाताची भीती"




पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर

बोईसर : ग्रामपंचायत पास्थळ हद्दीतील MSEB पंपाच्या गेटसमोर गटार तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पंपाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पाणी साचत असल्याने वाहनांना आत-बाहेर ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

पंपावर दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच इतर व्यावसायिक वाहने इंधन भरण्यासाठी येत असतात. मात्र, प्रवेशद्वारावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना सावधपणे वाहन चालवत पंपात प्रवेश करावा लागत आहे. पाण्याखाली खड्डे अथवा रस्त्याची स्थिती दिसत नसल्याने दुचाकी घसरण्याचा धोका वाढला असून, किरकोळ अपघात होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या एक-दोन दिवसांची नसून अनेक दिवसांपासून कायम आहे. गटारातील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात पंपाच्या गेटसमोर पाणी साचते. पाऊस थांबल्यानंतरही अनेक तास पाणी कायम राहत असल्याने वाहनांची ये-जा अडथळ्यांची ठरत आहे. काही वाहनचालकांना इंधन भरण्यासाठी पंपात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना वाहन वळविण्यातही अडचणी येत आहेत.

याशिवाय, साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती वाढल्याचेही स्थानिकांनी सांगितले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती असल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप गटाराची साफसफाई किंवा कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता गटाराची दुरुस्ती, पाण्याचा सुरळीत निचरा आणि पंपाच्या प्रवेशद्वारावरील रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक, स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही समस्या गांभीर्याने घेऊन संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.