दिग्रस येथील पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : मुंबई उत्तर- पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना गंभीर धमकी दिली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून संपूर्ण पत्रकार जगतात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने चौथ्या स्तंभाचा असा अवमान करणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर थेट आघात करणारे आहे. त्यामुळे सदर खासदारावर कायदेशीर कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षिततेकडे लक्ष घालावे, अशी मागणी येथील निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ दिग्रस शाखेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
केवळ शिवीगाळ न करता 'बघून घेईन' अशा भाषेत उघड धमकी देण्यात आली. यामुळे ग्रामीण व निर्भयपणे काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेने निवडून दिलेल्या खासदाराचे असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. त्यांनी पदाची गरिमा राखलेली नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल व निःपक्षपाती चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर लक्ष्मण टेकाळे, पुरुषोत्तम कुडवे, संजय राऊत, विलास निकम, लुकमान खान, संतोष कदम, लक्ष्मण चव्हाण, राजपाल बनसोड, उमेश भटकर, प्रफुल्ल व्यवहारे, सुरेश चिरडे, अफझल खान, अब्दुल रफिक, सुनिल हिरास आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





Social Plugin