ग्रामीण प्रतिनिधी :
धडगाव तालुक्यातील मनवाणी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या फरशी पुलाचा भराव अवघ्या महिनाभरातच खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेले हे काम इतक्या कमी कालावधीत निकृष्ट अवस्थेत पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अलीकडील पावसामुळे पुलाचा भराव वाहून गेला असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.मनवाणी सह परिसरातील अनेक गावांतील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि व्यापारी या मार्गाचा दररोज वापर करतात.
भराव खचल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून खचलेला भराव मजबूत पद्धतीने दुरुस्त करावा,व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होईल अशा पद्धतीचे काम लवकर पूर्ण करावे. तसेच पुलाच्या बांधकामाची तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळा अद्याप सुरू असल्याने या पुलाची त्वरित दुरुस्ती न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





Social Plugin