हजारो भाविकांनी स्वीकारले स्वामींचे गुरुपद
बुध दि. [प्रकाश राजेघाटगे ]
गुरुचरणी श्रद्धा अर्पण करण्यासाठी हजारो भाविकांनी एकवटत श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र, निढळ दरबार येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला. दिवसभर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 'श्री स्वामी समर्थ'च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दिवसभरात भाविक व सेवेकऱ्यांनी विधिवत स्वामींचे गुरुपद स्वीकारून गुरुचरणी आपली श्रद्धा अर्पण केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू होती. विविध भागांतून आलेल्या स्वामीभक्तांनी शिस्तबद्धपणे दर्शन घेत गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक आनंद अनुभवला.उत्सवाला बांधिलकीची जोड देत दरबारात आयोजित रक्तदान शिबीरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ३५ भाविक व सेवेकऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला. धार्मिक श्रद्धेसोबतच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा या माध्यमातून अधोरेखित झाली.
दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. आरतीच्या वेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत स्वामींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. दर्शन, आरती आणि गुरुपदस्वीकारण्यासाठी दरबारात दिवसभर भाविकांची वर्दळ कायम होती. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त खटाव, माण तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविक आणि सेवेकरी उपस्थित होते.
उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री हरिष खुस्पे (दादा) व समस्त सेवेकरी परिवाराच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. दर्शन व्यवस्था, धार्मिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर आणि महाप्रसादाचे नियोजन सुरळीतपणे पार पडण्यासाठी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे संपूर्ण गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभाव, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या त्रिवेणी संगमात उत्साहात संपन्न झाला.





Social Plugin