रुग्णाला डोलीने, विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते.
प्रतिनिधी मोखाडा सौरभ आहेर
जव्हार | स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली तरी आदिवासी भागातील विकास अजूनही कागदावरच आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारे चित्र जव्हार तालुक्यातील खडकीपाडा गावात पाहायला मिळत आहे.स्थानिक आमदार आणि खासदार फक्त सोसिअल मीडिया वर ऍक्टिव्ह आहेत.
पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या वाळवंडा गावासमोरच असलेल्या खडकीपाड्यात पावसाळा सुरू होताच संपूर्ण गावाचा संपर्क तुटतो. गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर पूल नसल्याने नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावात एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी दुसरा पर्यायच नाही. 4-5 तरुण मिळून
रुग्णाला डोलीत घालतात आणि भर पावसात, दगड असलेल्या नदीतून जीव धोक्यात घालून पलीकडे घेऊन जातात. एक चूक झाली तर जीवावर बेतू शकते. याच नदीमुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही रोज कसरत करावी लागते.
पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने मुलांना शाळा बुडवावी लागते. किंवा जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागते. खडकीपाडा हे जव्हारपासून हाकेच्या अंतरावर असले तरी पायाभूत सुविधा मात्र शून्य आहेत. ग्रामस्थांची मागणी आहे की तातडीने नदीवर पूल बांधण्यात यावा. अन्यथा पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील.





Social Plugin