गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा तालुक्यामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा पाऊस न आल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत दिसत आहे
कारंजा सह इतर ग्रामीण भागामध्ये पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे अक्षरशः आभाळाकडे लागले असून, पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदा सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध पिकांची पेरणी केली. सुरुवातीला पिकांची उगवण समाधानकारक झाली असली तरी आता पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी होऊ लागल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यतापावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर संकटाचे सावट; शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षानिर्माण झाली आहे.पिकांना पावसाची नितांत गरज सध्या अनेक खरीप पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. या काळात पिकांना पुरेसा पाऊस मिळणे अत्यावश्यक आहे.
मात्र, पावसाने खंड घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम तुलनेने अधिक जाणवू शकतो. पावसाचा आणखी विलंब झाल्यास पिकांची वाढ मंदावण्याबरोबरच उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवले जात असून, लवकरात लवकर दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खर्च वाढला, आता पावसाची चिंता
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मशागतीवर मोठा खर्च केला आहे. पिके जोमाने वाढतील आणि चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असताना पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचीचिंता वाढली आहे. आधीच शेतीमालाच्या दरातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत.
वरुणराजाच्या कृपेकडे नजर
आकाशात ढग दाटून येत असले तरी अपेक्षित पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. पावसाची एखादी चांगली सर झाली तरी जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस पडून पिकांना दिलासा मिळावा, अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाचा खंड आणखी वाढू नये आणि खरीप पिकांना वेळेवर आवश्यक पाणी मिळावे, यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष आता पूर्णपणे आभाळाकडे लागले आहे.





Social Plugin