Ticker

6/recent/ticker-posts

खडक्या नाल्याला पूर; अमळनेर–चोपडा मार्ग ठप्प, सावखेड्यासह अनेक गावांचा संपर्क तुटला



प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर प्रतिनिधी)

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर–चोपडा मार्गावरील खडक्या नाल्याला मोठा पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नाल्यावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक थांबविली. परिणामी सावखेड्यासह

परिसरातील अनेक गावांचा अमळनेर व चोपडा शहरांशी संपर्क तात्पुरता तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पूरामुळे दोन्ही बाजूंना एसटी बस, खासगी वाहने, दुचाकी तसेच मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवासी तासन्तास अडकून पडले. शालेय विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच अत्यावश्यक कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या मार्गावर आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करावी तसेच पूरस्थिती कमी होईपर्यंत वाहतूक सुरक्षितपणे नियंत्रित करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याच्या प्रवाहातून कोणत्याही परिस्थितीत वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


सध्या परिसरात पावसाचा जोर कायम असून खडक्या नाल्यावरील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.