मुन्ना येरेकार ग्रामीण प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा तसेच साईकृपा शिक्षण प्रसारक मंडळ चिखलगांव संचालित साईकृपा माध्यमिक विद्यालय, मुर्धोणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साही प्रभातफेरीने झाली. विद्यार्थ्यांनी हाती तिरंगा व फलक घेऊन देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण गावातून रॅली काढली. यानंतर शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित विचारपीठावरून मान्यवरांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाषणांमधून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, महात्मा गांधीजींची चले जाव चळवळ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे योगदान व चिमूरच्या क्रांती लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला. यासोबतच आधुनिक युगात शिक्षणाचे आणि स्वावलंबनाचे महत्त्व किती मोठे आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचाही सन्मान करण्यात आला.
या स्वातंत्र्य दिन सोहळ्यास गावातील नागरिक, ग्रामस्थ, दोन्ही शाळांतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





Social Plugin