बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
विटा जवळील भाळवणी येथे येरळा नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहात अपघाती मृत्यू झालेल्या कोरेगाव तालुका कोरेगाव येथील उच्चशिक्षित युवती फिरदोस शिकलगार हिच्या दुःखात होरपळणाऱ्या कुटुंबाला पुणे जमात शिकलगार संघाच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. हा कार्यक्रम कोरेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी घेण्यात आला. संकटसमयी समाजाच्या माध्यमातून एक मायेचा हात देऊन कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
हातचा घास गेल्याने कुटुंबावर मोठा आघात’झाला आहे
मदतीचे वाटप करताना पुणे शिकलगार संघटनेचे अध्यक्ष सलीम शिकलगार म्हणाले, "हातातोंडाशी आलेली आणि उच्च शिक्षण घेणारी तरुण मुलगी अचानक सोडून गेल्याने शिकलगार कुटुंबावर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठा डोंगर कोसळला आहे. 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून पुणे जिल्हा शिकलगार संघटनेच्या वतीने ही मदत देण्यात येत आहे."
पुढे बोलताना त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, *"कुटुंबातील उरलेली दोन लहान मुले भविष्यात शिकून मोठी व्हावीत आणि समाजाला असाच हातभार लावणारी बनावीत. हे कुटुंब उघड्यावर न पडता अशा कठीण परिस्थितीत त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी. या कठीण काळात केवळ संघच नाही, तर संपूर्ण समाजाने या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे."*
यावेळी संघटनेचे सल्लागार दाऊद भाई शिकलगार यांनीही आपले विचार व्यक्त करत कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
या मदत वाटप प्रसंगी पुणे शिकलगार संघटनेचे सचिव असिफ शिकलगार, खजिनदार नजीर शिकलगार , पी आर ओ जमीर शिकलगार, संघटनेचे सदस्य अब्दुल शिकलगार, दस्तगीर शिकलगार, रिनाज शिकलगार व सर्व प्रमुख सदस्य, पदाधिकारी तसेच कोरेगाव येथील स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin