महाराष्ट्र ग्रामीण न्यूज प्रतिनिधी – संतोष घाणे | इगतपुरी
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सिन्नर मतदारसंघातील टाकेद ते वासळी फाटा हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्ता खचला आहे. संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, शालेय बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक वाहनेही या मार्गावर जाण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होत असून ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा रस्ता टाकेद, बारशिंगवे, सोनोशी, बांबळेवाडी, वासळी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती व करणाचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, पालक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.





Social Plugin