*सी. टी. बोरा महाविद्यालयात भौतिकशास्त्र प्रात्यक्षिक पुनर्रचना कार्यशाळा; ३७ प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग*
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
“करून शिकणे, अनुभवातून समजून घेणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे”या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ आणि सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर (घोडनदी) यांच्या संयुक्त विद्यमाने “टी. वाय. बी. एस्सी. भौतिकशास्त्र प्रात्यक्षिक पुनर्रचना व हँड्स-ऑन ट्रेनिंग” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सी. टी. बोरा महाविद्यालयात करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थीकेंद्रित, गुणवत्तापूर्ण आणि काळानुरूप अभ्यासक्रम विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारा आणि प्रयोगशीलता वाढविणारा अभ्यासक्रम तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवातून “प्रयोगशाळा ही केवळ उपकरणांची जागा नसून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला दिशा देणारी प्रयोगभूमी आहे”, हा दृष्टिकोन मांडला. महाविद्यालयातील सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरॲक्टिव्ह स्टाफ, अनुभवाधारित अध्यापन आणि प्रात्यक्षिके नेमकी कशी प्रभावीपणे घ्यावीत, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. शिवाजी भोसले आणि डॉ. रमेश भिसे यांनीही सहभागी प्राध्यापकांना विविध प्रयोग, अध्यापन पद्धती आणि प्रात्यक्षिकांच्या परिणामकारकतेविषयी मार्गदर्शन केले.
पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील निवडक महाविद्यालयांमधून एकूण ३७ प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदविला. भौतिकशास्त्रातील प्रात्यक्षिकांची पुनर्रचना, आधुनिक प्रयोगपद्धती, प्रयोगांमागील मूलभूत वैज्ञानिक संकल्पना, अचूक निरीक्षणे आणि परिणामांचे शास्त्रीय विश्लेषण यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.
कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले ते ‘हँड्स-ऑन ट्रेनिंग’ सहभागी प्राध्यापकांनी केवळ प्रयोगांचे प्रात्यक्षिक पाहण्याऐवजी स्वतः प्रयोग करून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे “पाहणे–करून पाहणे–समजून घेणे–विद्यार्थ्यांना शिकवणे” या अनुभवाधारित शिक्षणपद्धतीचा प्रभावी प्रत्यय सहभागी प्राध्यापकांना आला.
डॉ बोबडे, डॉ. सिद्धार्थ कांबळे, डॉ. सुभाष पांढरकर, आणि सहकाऱ्यांनी २० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रयोगांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रयोगांची कार्यपद्धती, निरीक्षणे, अचूकता, संकल्पनात्मक मांडणी तसेच विद्यार्थ्यांच्या अध्यापन-अधिगम प्रक्रियेत त्यांचा प्रभावी वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेमुळे प्राध्यापकांना आधुनिक प्रयोगशाळा कौशल्ये, प्रयोगाधारित अध्यापन आणि संकल्पनात्मक स्पष्टता यांचा समन्वय साधण्याची संधी मिळाली. परिणामी, भविष्यातील भौतिकशास्त्र शिक्षण अधिक रंजक, प्रयोगशील, विद्यार्थी-केंद्रित आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दत्तात्रय बोबडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ चैताली खेडकर व आभार डॉ एस पी कांबळे यांनी केले. सदर कार्यशाळेचे नियोजन उत्कृष्ट झाले तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण या संदर्भात अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया सहभागी प्राध्यापकांनी दिल्या .
प्रयोगशाळेतून ज्ञान, अनुभवातून कौशल्य आणि कौशल्यातून उत्कृष्ट अध्यापन असा संदेश देणारी ही कार्यशाळा भौतिकशास्त्राच्या प्रात्यक्षिक अध्यापनाला निश्चितच नवी दिशा देणारी ठरली.





Social Plugin