बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एम एस आर टी सी) सलग २६ वर्षे विना अपघात आणि कोणत्याही तक्रारीशिवाय निष्ठावंत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले एसटी चालक श्री. संजय महादेव गुरव (चालक क्र. ६३१७) यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. हरिदास जगदाळे यांच्या वतीने या विशेष सन्मानाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री. संजय गुरव यांनी १६ मे २००० रोजी राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून सेवेला सुरुवात केली होती. ३१ मे २०२६ पर्यंतच्या आपल्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी वाई, सातारा, कराड व सातारा विभागातील विविध मार्गांवर अत्यंत कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे एसटी बसचे सारथ्य केले. या उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडूनही त्यांना वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय आणि आदर्श सेवेची दखल घेऊन, महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्या शुभहस्ते श्री. संजय गुरव यांना 'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळातील एका निष्ठावंत चालकाच्या या गौरवाबद्दल एसटी कर्मचारी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे





Social Plugin