स्वप्नील घोटेकार ग्रामीण प्रतिनिधी गुजरी
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-आर्णी मार्गावरील दहेली गावाजवळ कुपटी नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, पती झाडाचा आसरा घेतल्याने सुदैवाने बचावले आहेत.लोणी येथील रहिवासी अविनाश खंदारे हे आपल्या कुटुंबीयांसह राळेगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर नातेवाईकांना बोरीअरब येथे सोडून ते पत्नी माधवी खंदारे(४०) ,मोठी मुलगी प्राची(१७) आणि लहान मुलगी साची(१२) यांच्यासह दारव्हा मार्गे स्वतःच्या लोणी या गावाकडे कारने परतत होते.
मध्यरात्रीच्या सुमारास दहेली गावाजवळील पुलावरून नदीच्या पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. अंधार असल्यामुळे अविनाश खंदारे यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यांची कार पुरात वाहून गेली.कार वाहून जात असताना अविनाश खंदारे यांनी चालत्या गाडीतून बाहेर उडी घेतली आणि पाण्याचा प्रवाह कमी असलेल्या ठिकाणी एका झाडाचा आसरा घेतला. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, त्यांची पत्नी माधवी आणि दोन्ही चिमुकल्या मुली कारसह पुरात वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
रात्रभर चाललेल्या मोहिमेनंतर पती अविनाश खंडारे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.यानंतर शुक्रवारी दुपारी दहेली गावानजीक नदीच्या पात्रात शोध पथकाला कारसह माधवी खंडारे, प्राची आणि साची यांचे मृतदेह आढळून आले. मृत माधवी खंडारे या लोणी येथील आश्रमशाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. एका सुशिक्षित आणि हसत्याखेळत्या कुटुंबावर ओढवलेल्या या अत्यंत दुर्दैवी प्रसंगामुळे लोणी गावासह संपूर्ण दारव्हा तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे





Social Plugin