ग्रामस्थांचे तहसीलदार सोनपेठ यांना निवेदन; रस्ता मजबुतीकरण व बांधकामाची मागणी
सोनपेठ (प्रतिनिधी) शिवशंकर तुपकर:दि. 19-08-2026
सोनपेठ तालुक्यातील मौजे थडीपिंपळगाव (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील मुख्य रस्ता, शिवरस्ते, पांदण रस्ते आणि सोनपेठ रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त मोकळे करण्यात यावेत, तसेच या रस्त्यांचे मजबुतीकरण व बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना शासकीय निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, थडीपिंपळगाव येथील शिरशी ते विटा रोड जोडणारा मुख्य रस्ता, गावाला जोडणारे इतर सर्व रस्ते, नकाशावरील दोन शिवरस्ते व गावाच्या शिवारातील पांदण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे शेतकरी, नागरिक व महिलांना ये-जा करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय योजनेच्या माध्यमातून या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवून रस्ते मोकळे करण्यात यावेत आणि रस्त्यांचे मजबुतीकरण व बांधकाम पूर्ण करण्यात यावे, अशी विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
उपोषाणाचा इशारा:
प्रशासनाने या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ अतिक्रमणे न हटवल्यास तहसील कार्यालय सोनपेठ समोर सर्व ग्रामस्थ आमरण उपोषणास बसतील, असा थेट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर सरपंच सूर्यकांत श्रीमंत कदम यांच्यासह अंगद सखाराम कदम, वसंत रावसाहेब तेलभरे. अशोक रामकिशन कदम, संपतराव विश्वनाथ कदम, प्रल्हाद निवृत्ती तेलभरे, विष्णू कोंडीबा कदम, संतोष हरिभाऊ कदम, माणिक भास्कर तेलभरे, राम बाबासाहेब तेलभरे व इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.





Social Plugin