Ticker

6/recent/ticker-posts

कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती श्री सेवागिरी विद्यालय, पुसेगाव आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रयत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची उपस्थितांना ओळख करून दिली. तसेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत रयत शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाचा आढावा घेत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्री सेवागिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सावंत यांनी अहवाल वाचन केले. अहवालातून श्री सेवागिरी विद्यालय, पुसेगावच्या शैक्षणिक, सामाजिक व विविध उपक्रमांच्या माध्यमातून झालेल्या वाटचालीचा आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. विद्यालयाच्या प्रगतीमध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक व संस्थेचे योगदान अधोरेखित केले.यावेळी विद्यार्थिनी कुमारी अनुष्का काटकर हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने बालपणी अनुभवलेल्या विविध प्रसंगांचे स्मरण करून त्यांनी विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि यशामागील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व समजावून सांगितले.

विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न राहता अभ्यासाबरोबरच विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रांतील  कलागुण विकसित करावेत, असे आवाहन डॉ. महानवर यांनी केले. ‘ मार्क्स कमी पडले म्हणून विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. परिस्थिती आणि अडचणींवर मात करून पुढे जाणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी होतो आणि मोठ्या पदावर पोहोचतो,’ असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा शिक्षणासाठी उपयुक्त साधन ठरू शकतो; मात्र त्याचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कारणांसाठीच केला पाहिजे, असे सांगून त्यांनी मोबाईलच्या विवेकी वापराचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून अभ्यास, ज्ञानार्जन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेचे महत्त्व विशद करताना डॉ. महानवर  यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी ही योजना किती दूरदृष्टीची होती, हे स्पष्ट केले. शिक्षण घेत असतानाच श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम या योजनेतून झाले, असे त्यांनी सांगितले.शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सर्वात जवळचा हितचिंतक असतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक सातत्याने मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील तरुण पिढी आणि तरुण रक्त हेच देशाचे भविष्य घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला मर्यादा न मानता मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी आई-वडील हेच खरे दैवत असून त्यांच्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश संपादन करावे, असेही डॉ. महानवर  यांनी स्पष्ट केले.शेतीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रणधीर जाधव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. आयुष्य जगत असताना ते योग्य पद्धतीने, चांगल्या विचारांनी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कसे जगावे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी केवळ इच्छा पुरेशी नसून त्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि उराशी मोठे स्वप्न बाळगणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमास श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगावचे मठाधिपती १०८ प. पू. श्रीमहंत सुंदरगिरी महाराज,  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. किसनराव खामकर, पंचायत समिती खटावच्या शिक्षण अधिकारी संगीता गायकवाड, उद्योजक विनायकराव काळे, गौरव जाधव, अभिजीत जाधव, जगदीश निर्मळ, शिवाजीराव जाधव तसेच कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समीर देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या  गुणवत्तेला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा संदेश या पारितोषिक वितरणातून देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार संजय क्षीरसागर यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. बेलोशे एम. आर. व प्रा. धोंगडे एस. आर. यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास श्री सेवागिरी विद्यालय व कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मवीरांच्या विचारांना उजाळा देत शिक्षण, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला.

छायाचित्र = पुसेगाव . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय डॉ. प्रकाश महानवर व विचार मंचावर प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, मुख्याध्यापक अशोक सावंत, संजय क्षीरसागर,रणधीर जाधव, उद्योजक विनायकराव काळे, गौरव जाधव,अभिजीत जाधव, दिपालीताई देवकर, जगदीश निर्मळ व इतर मान्यवर छाया - प्रकाश राजेघाटगे बुध