बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील निढळ गावची सुकन्या आरती दादासो खांडे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिच्या आईचा व तिचा नवतरुण ज्योतिर्लिंग मंडळ, निढळ येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
आरतीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निढळ येथे, माध्यमिक शिक्षण हनुमान विद्यालय निढळ येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण शहाजीराजे महाविद्यालय, खटाव येथे झाले. त्यानंतर तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन करून आपल्या करिअरची वाटचाल सुरू केली. सध्या नामांकित कंपनीमध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून तिची निवड झाली असून तिला तब्बल ९ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आरतीने शिक्षणाची कास सोडली नाही. अनेक अडचणींवर मात करत तिने जिद्दीने आणि चिकाटीने आपले ध्येय गाठले. तिचा हा संघर्षमय प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
यावेळी श्री. चंद्रकांत दळवी साहेब यांनी आरतीच्या यशाचे कौतुक करताना, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिने मिळवलेले यश हे तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फलित असल्याचे सांगितले. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून पुढे जाण्याचा आदर्श आरतीने निर्माण केला असून तिचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे, असे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना आरतीने आपल्या मनोगतात मिळालेल्या संधीचे सोने करून सातत्याने पुढे जात राहण्याचा संदेश दिला. शिक्षण, कष्ट आणि योग्य संधी यांचा समन्वय साधल्यास कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते, हे तिने आपल्या वाटचालीतून दाखवून दिले आहे.
आरतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल निर्मळ वाडा परिवार, नवतरुण ज्योतिर्लिंग मंडळ तसेच सर्व गणेशभक्तांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे निढळ गावाच्या शैक्षणिक परंपरेला आणखी एक मानाचा तुरा लाभला असून, तिची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे. आरतीच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.





Social Plugin