बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी रयत संघटनेच्या माध्यमातून श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी आयोजित केलेल्या गौरी-गणपती घरगुती सजावट स्पर्धेत सुप्रिया अमोल जाधव यांनी केंद्र व राज्यातील विविध भागांतील पेपरफुटीच्या घटनांच्या अनुषंगाने जनजागृती करणारा देखावा सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. श्री सेवागिरी महाराजांचे महात्म्य तसेच महाराजांचे उगमस्थान असलेल्या गिरनारची प्रतिकृती सादर करणाऱ्या माधवी संतोष तोडकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
श्री गणेशोत्सवानिमित्त पुसेगाव येथे आयोजित या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेत गावातील तब्बल ३९१ महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेला देवपूजेचे ताट भेट देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
निर्मला दत्तात्रय माने यांनी ‘सर्वधर्मसमभाव’ संदेश देणारा देखावा सादर करून तृतीय क्रमांक मिळविला. गावातील ज्वलंत आणि महत्त्वाच्या कचरा व्यवस्थापनाच्या विषयावर सजावट सादर केल्याबद्दल वंदना दत्तात्रय देवकर, तर पुसेगावच्या बाह्यवळण रस्त्याच्या संवेदनशील विषयावर देखावा सादर केल्याबद्दल जनाबाई सत्यवान शिंदे यांना संयुक्तपणे चतुर्थ क्रमांक देण्यात आला.
गोवंश बचावाचा संदेश देणारी सजावट सादर केल्याबद्दल आशा राहुल जाधव, तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारी सजावट केल्याबद्दल पार्वती प्रशांत झगडे यांची पाचव्या क्रमांकासाठी निवड झाली. प्रथम पाच क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर आणि मिक्सर अशी बक्षिसे देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ही बक्षिसे विजेत्यांच्या घरी जाऊन देण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण श्री सेवागिरी विद्यालयातील पाच शिक्षकांनी केले. विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि स्थानिक प्रश्नांवर जनजागृती करणारे देखावे सादर झाल्याने स्पर्धेला सामाजिक संदेशाची जोड मिळाली.





Social Plugin