सोनपेठ ( प्रतिनिधी) | : शिवशंकर तूपकर
दिनांक: ७ सप्टेंबर २०२६
सोनपेठ तालुक्यात चालू खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सोनपेठ तालुका तात्काळ 'दुष्काळग्रस्त' घोषित करून शेतकऱ्यांना दुष्काळातील सर्व सवलती व भरीव मदत मिळावी, या मागणीसाठी आज शेतकरी प्रतिनिधींच्या वतीने तहसीलदार, सोनपेठ यांना निवेदन देण्यात आले.
"शेतकरी जगला तरच शेती जगेल आणि शेती जगली तरच ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल," असे ठामपणे मांडत शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
दुष्काळ घोषणा: सोनपेठ तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त घोषित करून सर्व दुष्काळी सवलती तातडीने लागू कराव्यात.
हेक्टरी आर्थिक मदत: NDRF व SDRF च्या निकषांनुसार जिरायती पिकांसाठी ₹५०,००० प्रति हेक्टर तर बागायती पिकांसाठी ₹१,००,००० प्रति हेक्टर आर्थिक मदत देण्यात यावी.
२५% अग्रीम पीक विमा: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 'हंगामातील प्रतिकूल परिस्थिती' या जोखीमखाली शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई त्वरित द्यावी.
DBT द्वारे मदत: चारा छावण्या उभारण्याऐवजी पशुपालकांना थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT) आर्थिक मदत वर्ग करावी.
वीज व पाणी पुरवठा: पिकांना जगवण्यासाठी शेतीसाठी २४ तास अखंडीत वीजपुरवठा करावा, तसेच माजलगाव कालव्यातून सोनपेठ तालुक्यासाठी तातडीने पाणी सोडावे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर हेमचंद्र शिंदे, सुधीर बिंदू, विश्वंभर गोरवे, जगन्नाथ जाधव, अरुण मुंढे, श्रुषीभैया जोगदंड, माधव घुन्नार, महेश जोगदंड, किरण सोळंके, सोमनाथ नागूरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






Social Plugin