प्रतिनिधी विजय गायकवाड
रिसोड: पंचायत समिती रिसोड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मांगूळ झनक येथे २२ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या करण्यात आले. या परिषदेत केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास माननीय शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री विठ्ठलराव भुसारे साहेब यांनी विशेष भेट देऊन सर्व शिक्षकांचे मनोधैर्य व उत्साह वाढवणारे मोलाचे मार्गदर्शन करत जिल्हा परिषद शाळेचा पट वाढवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत शिक्षकांच्या विविध शैक्षणिक समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांचे योग्य निराकरण केले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्रीनिवास कडेकर यांनी उपस्थित राहून मूल भेट प्रपत्र कसे भरावे याबाबत शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच केंद्रातील आयडॉल शिक्षक श्री राहुल साखरेकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा शिक्षणाधिकारी महोदय यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला..
दिवसभरात आयोजित विविध सत्रांमध्ये तज्ज्ञ सुलभकांनी मार्गदर्शन केले:
सत्र १: निपुण महाराष्ट्र – अध्ययन स्तर निश्चिती, विश्लेषण व कृती कार्यक्रम या विषयावर केंद्रप्रमुख श्री उमाकांत काष्टे सर यांनी मार्गदर्शन केले.
सत्र २: जिल्हास्तरीय उपक्रमांची माहिती – स्पर्धा परीक्षा व इंग्रजी भाषा विकास यावर श्री शिवकल्प बाजड सर यांनी प्रकाश टाकला.
सत्र ३: अध्ययन अनुभवांची देवाणघेवाण व डिजिटल साहित्याचा/ई-स्मार्ट टीव्हीचा वापर याबाबत श्री संजय पवार सर यांनी माहिती दिली.
सत्र ४: गणित व विज्ञान, PM e-VIDYA, प्रशिक्षण व PARAKH यांसारख्या राज्याच्या धोरणात्मक विषयांवर श्री सतीश सावळे सर यांनी सुलभक म्हणून भूमिका निभावली.
सत्र ५: शालेय समस्यांवर चर्चा, मासिक नियोजन व समारोप सर्व सुलभक व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.
या संपूर्ण परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री उमाकांत काष्टे सर यांनी केले. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री सज्जन बोडखे सर आणि सर्व शिक्षकवृंदाचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार श्री सज्जन बोडखे सर यांनी मानले.





Social Plugin