Ticker

6/recent/ticker-posts

गणेशपूरच्या रस्त्याची पाणंद रस्त्यापेक्षाही मोठी दुरवस्था.



अनिल चव्हाण (प्रतिनिधी जाफराबाद)

जाफराबाद तालुक्यातील गणेशपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २० वर्षांपूर्वी झालेल्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी राजस्व अभियानात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते; परंतु अद्यापही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

गणेशपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्याची पाणंद रस्त्यापेक्षाही दुरवस्था झाली आहे. हा रस्ता गणेशपूर, धनगरवाडी, गाडेगव्हाण या गावांना जोडणारा आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम २० वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यावेळी फक्त एक किलोमीटर काम झाल्याने ग्रामस्थांनी धनगरवाडीपर्यंत रस्ता करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अगस्त ऋषर्षीचे ठिकाण याच परिसरात आहे. यामुळे भाविकांचीही या भागात ये-जा असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णांना रुग्णालयात येताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे गणेशपूर गावाला लगतच्या बाजारपेठेतूनच संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करावी लागते. याशिवाय आठवडे बाजारालाही टेंभुर्णी येथे जावे लागत असल्याने महिलांची दमछाक होते.

वारंवार मागणी करूनही रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. राजस्व अभियानांतर्गत शिबिरात रस्त्यासंदर्भात निवेदन दिले आहे. यातून ग्रामस्थांना समाधान मिळते की नाही याबाबत शंका आहे. गणेश गाडेकर, ग्रामस्थ, गणेशपूर