(वसिमखॉं पठाण@जिल्हा प्रतिनिधी)
दि:(०३/१०/२०२६)
शिराढोण : गाव परिसरातील एका विहिरीत कोल्हा पडल्याची घटना समोर आल्यानंतर वन्यप्राणी मित्र अनिल गायसमुद्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कोल्ह्याची सुखरूप सुटका केली. तब्बल दोन तास विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती मिळताच अनिल गायसमुद्रे यांनी परिस्थितीची पाहणी करून सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू करण्याची तयारी केली. विहिरीची खोली आणि कोल्ह्याची अवस्था लक्षात घेऊन काळजीपूर्वक बचावकार्य करण्यात आले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
रेस्क्यू केल्यानंतर कोल्ह्याची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास अनेकदा त्यांना मदतीची गरज असते. अशा वेळी वन्यजीवांप्रती संवेदनशीलता, धाडस आणि निसर्गप्रेम जपत अनिल गायसमुद्रे यांनी केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
वन्यजीवांचे संरक्षण हे केवळ वनविभागाचे कर्तव्य नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अनिल गायसमुद्रे यांच्या या कार्यातून ‘वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा’ हा संदेश अधोरेखित झाला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






Social Plugin