आकस्मिक मृत्यूची नोंद; खर्डा पोलिसांकडून तपास सुरू
अहिल्यानगर | जामखेड : जामखेड तालुक्यातील मोहरी येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने मोहरीसह संपूर्ण जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव प्रतिभा अर्जुन कांबळे (वय ३०, रा. मोहरी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा कांबळे या दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मोहरी शिवारातील संभाजी महादेव हाके यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह विहिरीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रतिभा कांबळे यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मृत महिलेचे पती अर्जुन छगन कांबळे (वय २४, रा. मोहरी) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार खर्डा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक २१/२०२६ अशी नोंद केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.
प्रतिभा कांबळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? त्या विहिरीपर्यंत कशा पोहोचल्या? तसेच या घटनेमागील परिस्थिती काय होती? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
महाराष्ट्र ग्रामीण न्यूज
जामखेड तालुका प्रतिनिधी – अनिकेत चव्हाण





Social Plugin