Ticker

6/recent/ticker-posts

पोहा महसूल मंडळात महागाव गावाचा समावेश करण्यासाठी निवेदन सादर



डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

कारंजा : नव्या महसूल मंडळ रचनेनुसार कारंजा तालुक्यातील मौजे महागावचा समावेश कामरगाव महसूल मंडळात करण्यात आला आहे. मात्र महागाव ते कामरगाव हे अंतर अधिक असल्याने नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महागावचा समावेश पोहा महसूल मंडळात करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत महागावच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने १ ऑक्टोबर रोजी कारंजा तहसील कार्यालयात निवेदन सादर केले. नव्या महसूल मंडळ रचनेनुसार महागाव हे कामरगाव महसूल मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु महागाव ते कामरगावचे अंतर अधिक असल्यामुळे नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी कामरगाव येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत असून, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महागावचा पोहा महसूल मंडळात समावेश झाल्यास नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी अधिक सोयीचे ठिकाण उपलब्ध होईल. प्रशासनाशी संपर्क साधणे तसेच विविध दाखले, महसूलविषयक कामे आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रक्रियेसाठी नागरिकांची होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होईल, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.

नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन महागाव गावाचा पोहा महसूल मंडळामध्ये समावेश करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती तहसीलदारांना करण्यात आली आहे. या निवेदनासोबत ग्रामसभेचा ठरावही जोडण्यात आला आहे. ग्रामपंचायत महागावचे सरपंच अरुण धनसिंग चव्हाण, उपसरपंच नितीन दीलीपराव डुकरे आणि सचिव सुरळकर  वसंत राठोड तंटामुक्ती अध्यक्ष महागाव भास्कर डुकरे शिवाजी चिनक यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या मागणीमुळे महागावचा पोहा महसूल मंडळात समावेश करण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.