पत्रकार : गावित चंद्रकांतग्रामीण प्रतिनिधी, बोरशेती
मोखाडा : रयत शिक्षण संस्थेचे,लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मतदान नोंदणी कार्यालय, मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन मतदार नोंदणी व जनजागृती अभियान’ आयोजित करण्यात आले. या अभियानाचा मुख्य
उद्देश पात्र विद्यार्थ्यांमध्ये व नागरिक यांना मतदानाविषयी जागृती निर्माण करणे, नवीन मतदारांची नोंदणी करण्यास प्रोत्साहन देणे आणि लोकशाही प्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढविणे हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. चांदोरे होते. कार्यक्रमाला मोखाडा तहसीलचे नायब तहसीलदार श्री. गौरव बागारा , नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री. गुणवंत पाटील आणि महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. एस. जी. मेंगाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. व्हंडे यांनी केले. यावेळी त्यांनी नवीन मतदार नोंदणीचे महत्त्व, ऑनलाइन प्रक्रियेची माहिती तसेच मतदानाचा हक्क, मतदार नोंदणीची प्रक्रिया आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचे स्थान याविषयी थोडक्यात माहिती दिली व पात्र विद्यार्थ्यांकडून मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या बळकटीकरणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित तहसीलदार श्री. गौरव बागारा यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान हा प्रत्येक पात्र नागरिकाचा महत्त्वाचा अधिकार आहे. मतदानाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या आणि समाजाच्या भविष्याच्या जडणघडणीत सहभागी होत असतो. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र युवक-युवतीने आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज राहावे. आजचा तरुण हा देशाचे भविष्य आहे. युवकांनी लोकशाही प्रक्रियेविषयी जागरूक राहणे, मतदार नोंदणी करून घेणे आणि आपल्या कुटुंबातील तसेच परिसरातील नागरिकांनाही याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. केवळ मतदान करणे महत्त्वाचे नाही, तर योग्य माहितीच्या आधारे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि कोणताही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी अशा जनजागृती अभियानांची आवश्यकता आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन मतदानाविषयी समाजात जागृती निर्माण करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी, ‘माझे मत, माझा अधिकार आणि माझी जबाबदारी’ ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजली पाहिजे. सजग मतदार हेच सक्षम लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. एन. चांदोरे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ स्वतः मतदार नोंदणी करून थांबू नये, तर आपल्या कुटुंबात आणि परिसरातही मतदानाविषयी जागृती निर्माण करावी, असे सांगितले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मोखाडा तालुक्यातील बी. एल. ओ. यांनी देखील विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर सहा विषयी सखोल मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र घाटाळ यांनी केले. प्रा. टी. एम. पराडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने आयोजित या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. एस. के. डामसे प्रा. डॉ. देविदास बोरुडे, प्रा. पंकज भोये व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin