पुसेगाव दि [प्रकाश राजेघाटगे ]
वर्धनगड, ता. खटाव येथील श्री वर्धिनी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्ती स्पर्धेत पुणे येथील हनुमान आखाड्याचे पैलवान ओंकार जाधव यांनी शिवरामदादा तालीम, पुणे येथील पैलवान मंगेश माने यांच्यावर मात करत एक लाख एक रुपयांच्या मानाच्या कुस्तीवर आपले नाव कोरले. तब्बल ३० मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या लढतीत ओंकार जाधव यांनी डंकी डावावर मंगेश माने यांना चितपट केले. कुस्ती निकाली होताच हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष करत विजेत्या पैलवानाचे स्वागत केले.
या कुस्ती स्पर्धेत राज्यातील नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. शंभर रुपयांपासून ते एक लाख एक रुपयांपर्यंतच्या विविध कुस्त्या आखाड्यात रंगल्या. त्यामुळे कुस्तीप्रेमींना दर्जेदार आणि चुरशीच्या लढती पाहण्याची संधी मिळाली.
स्पर्धेचे उद्घाटन स्थानिक सोसायटीचे माजी चेअरमन अर्जुन जाधव, विठ्ठल सावंत, किसन जाधव तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मानाच्या कुस्तीचे पंच म्हणून कल्याण जाधव आणि सुरेश पैलवान यांनी काम पाहिले, तर रोहन केंजळे यांनी प्रभावी समालोचन केले.
श्री वर्धिनी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित या कुस्ती मैदानाला कुस्तीप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. पैलवानांच्या दमदार डावपेचांनी आणि अटीतटीच्या लढतींनी वर्धनगडचा आखाडा उत्साहाने फुलून गेला.





Social Plugin