प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर
अमरावती–नांदगाव खंडेश्वर मार्गावरील संभाव्य धोकादायक ठिकाणांचा अहवाल सादर; सुरक्षा उपाययोजनांसाठी दोन शासकीय कार्यालयांचे वेधले लक्ष
अमरावती : रस्त्यावर अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धावपळ करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच संभाव्य धोके दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच विचारातून गौरव ब्राम्हणवाडे यांनी अमरावती ते नांदगाव खंडेश्वर मार्गावरील रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
रात्रीच्या प्रवासादरम्यान रस्त्यावरील काही संभाव्य धोकादायक ठिकाणे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणांची निरीक्षणे नोंदवून सविस्तर अहवाल तयार केला. हा अहवाल व अर्ज मा. उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), बडनेरा तसेच मा. कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प (स. बा.) विभाग, अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. दोन्ही कार्यालयांतून अर्जाची पोहोचही घेण्यात आली आहे.
पुलांवर आवश्यक सुरक्षा कठडे किंवा लोखंडी रेलिंग, धोकादायक वळणांपूर्वी रिफ्लेक्टर, दिशादर्शक व सावधानतेचे फलक, तसेच गावांच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी योग्य वेग नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याची गरज अहवालातून मांडण्यात आली आहे. संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक निकषांनुसार आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
“अपघात झाल्यानंतर नुकसान भरून काढण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच धोका ओळखून उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे,” हा या पुढाकारामागील मुख्य विचार आहे.
रस्ते सुरक्षा ही केवळ एखाद्या विभागाची जबाबदारी नसून, नागरिकांच्या जीविताशी संबंधित बाब आहे. प्रशासनाने अशा सूचनांची वेळेत दखल घेतल्यास संभाव्य अपघातांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभाग या अहवालाची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक कार्यवाही करतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.
या उपक्रमातून रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी आणि संबंधित ठिकाणी आवश्यक सुधारणा व्हाव्यात, हा उद्देश आहे.





Social Plugin