![]() |
छायाचित्र - पुसेगाव - बैलगाड्या शर्यतीच्या मैदान सपाटीकरण कामाचा शुभारंभ करताना देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव आदी मान्यवर. |
सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेसाठी ट्रस्टला अनेकांचे सहकार्य
बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यांचा वार्षिक रथोत्सव सोहळा ६ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या कालावधीत देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या यात्रेचे मुख्य आकर्षण आणि आख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या हिंद केसरी बैलगाड्या शर्यतीच्या नवीन मैदानासाठी ट्रस्टच्यावतीने जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून पुसेगाव यात्रेतील बैलगाड्या शर्यती या पुसेगाव निढळ रस्त्यालगत भरवल्या जात होत्या. त्याठिकाणी बैलगाड्या शौकीन आणि बैलगाड्या मालक चालक यांना सोसावा लागत असलेला नाहक त्रास आणि तांत्रिक अडचणीवर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून तोडगा निघाला आहे. पुसेगाव, वेटणे आणि धावडदरे या तिन्ही गावांच्या हद्दीवर असलेल्या पुसेगाव ग्रामस्थांनी स्वतःची करंजाळा शिवारातील महादेव मंदिराच्या पूर्वेला असलेली सुमारे ३८ ते ४० एकर जमीन यावर्षीच्या बैलगाड्या शर्यतीसाठी विना मोबदला उपलब्ध
करून दिली आहे. सध्या या पडीक जमिनीचे सपाटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. याकामासाठी ग्रामस्थ मदनशेठ जाधव, संतोष वाघ, रोहन जाधव, गणेश जाधव, तोडकर बंधू यांनी आपली मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. दोन दिवसापासून या कामावर ३ पोकलैंड आणि ६ डंपर रात्रंदिवस जमिनीचे सपाटीकरणाचे काम करत आहेत. तसेच या कामासाठी असलेल्या मशिनरी चालक व सहायक यांना राहण्यासाठी तंबूची सुविधा करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची ट्रॅक्टर टाकी उपलब्ध करून दिली आहे. तसेच या ठिकाणी रात्रीच्या काळात विजेची सोयही केली आहे. या सर्व मशिनरीना डिझेल इंधनाचा पुरवठा देवस्थान ट्रस्ट करणार आहे. बैलगाडी शौकिनांकडूनही या कामासाठी देवस्थान ट्रस्टला आर्थिक मदतीचा हातभार लागत असून ज्यांना या कामासाठी आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा.
या बैलगाड्या शर्यतीच्या मैदान सपाटीकरण कामाचा शुभारंभ मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष वाघ, गौरव जाधव, सचिन देशमुख व बैलगाड्या शर्यती समितीचे सर्व पदाधिकारी आणि शौकिनांच्या उपस्थितीत झाला.
काही तांत्रिक अडचणीमुळे बैलगाडी शर्यतीचे मैदान बदलण्यात आले आहे. या शर्यती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शौकिनांसाठी यावर्षी कोणतीही अडचण येणार नाही अशी व्यवस्था देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे. आसपास छोट्या मोठ्या टेकड्या असल्याने सर्वांना याचा फायदा होणार आहे.चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव.





Social Plugin