पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर
०५ नाोव्हेंबर २०२६
बोईसर : केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, जागतिक दृष्टिकोन, क्रीडा, कला, संस्कृती आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणाऱ्या बोईसर येथील विराज इंटरनॅशनल स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. EducationWorld India School Rankings 2026-27 मध्ये शाळेने बोईसरमध्ये प्रथम क्रमांक, तर महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळविल्याचा गौरवशाली उल्लेख शाळेच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
'Beyond Classrooms, Beyond Boundaries' या संकल्पनेतून शाळा विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू, संवेदनशील आणि भविष्याच्या आव्हानांसाठी सक्षम जागतिक नागरिक बनविण्याच्या दिशेने कार्यरत आहे.
शाळेमध्ये नियोजनबद्ध शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारसरणी, सर्जनशीलता, क्रीडा आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात ध्यानधारणा आणि सकारात्मक उपक्रमांनी होत असून, यामुळे त्यांच्यामध्ये आत्मशिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते.
क्रीडा क्षेत्रातही शाळेने विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अर्ध-ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावामुळे विद्यार्थ्यांना पोहण्याचा सराव आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित करण्याची संधी मिळत आहे. याशिवाय संगीत, नृत्य, नाट्य आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ दिले जात आहे.
जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाळेने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांवरही भर दिला आहे. इयत्ता अकरावीतील अक्षय बिजानिया याला फ्रान्समधील विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख शाळेने केला आहे. तसेच शाळेला TEDx परवानगी मिळाल्याने 'TEDxViraj' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार, कल्पना आणि नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, सामाजिक बांधिलकी जपत शाळेकडून पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलती आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांसोबतही सहकार्य केले जात आहे.
शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणारे उपक्रमही शाळेत राबविले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय संधी, क्रीडा सुविधा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत विराज इंटरनॅशनल स्कूलने बोईसरच्या शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांच्या पलीकडे जाऊन नव्या संधींचे विश्व खुले करून देण्याचा शाळेचा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय ठरत आहे.





Social Plugin