मालेगांव प्रतिनिधी | एस. सावंत
नीट (यूजी) २०२६ या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करत, मालेगाव (ता. अर्धापूर) येथील गुणवंत विद्यार्थिनी कु. शालिनी कैलास इंगोले हिची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आयोजित ‘सीएपी’ (CAP) फेरी-३ मध्ये श्री आयुर्वेद महाविद्यालय (शासकीय आयुर्वेद महाविद्यालय), नागपूर येथे बी.ए.एम.एस. (B.A.M.S.) या पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
शालिनी हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश संपादन केले आहे. यापूर्वी पहिल्या फेरीत तिची निवड नाशिक येथील आयुर्वेद महाविद्यालयात झाली होती. मात्र, तिसऱ्या फेरीत तिला नागपूर येथील नामांकित व प्रतिष्ठित शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने तिच्या या यशाने अधिक उंच भरारी घेतली आहे.
शालिनीचे आई-वडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शालिनीने आपल्या सर्व यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला आणि मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे.
वैद्यकीय (आयुर्वेद) क्षेत्रात उत्तम शिक्षण पूर्ण करून ग्रामीण भागातील गरजू व वंचित रुग्णांची मोफत आणि प्रामाणिक सेवा करण्याची आपली इच्छा असल्याचे शालिनीने या वेळी व्यक्त केले.
शालिनीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मालेगांव परिसरातील मान्यवर, नागरिक आणि ग्रामस्थांकडून तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे, तिच्या या यशामुळे मालेगांव च्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.





Social Plugin