Ticker

6/recent/ticker-posts

खारपाणपट्यात मोत्यासारखे कणीस शेतकऱ्यांना देत आहे जगण्याचे बळ

खरीप ज्वारीला पाठ फिरवत उन्हाळी ज्वारील पसंती

सुनिल बांगर चोहोट्टा बाजार 

  चोहोट्टा बाजार.अकोट तालुक्यातील कुटासा चोहोट्टा बाजार परिसरात शेतकऱ्यांनी ज्वारीच्या उन्हाळी सुधारित वाणाची पेरणी केली. शेतात डोलत असलेले हिरवेगार ज्वारीचे मोत्यासारखे कणीस या भागातील शेतकऱ्यांना जगण्याचे एकप्रकारे बळ देत आहे.गत काही वर्षांत विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या ज्वारी पिकाकडे पाठ फिरवली होती. मात्र आता पुन्हा खरिपाऐवजी रब्बी, उन्हाळी हंगामात ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

सध्या गव्हापेक्षा ज्वारी खाण्याकडे शहरी नागरिकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच गव्हाच्या तुलनेत ज्वारी भाव खात आहे. तसेच पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई भेडसावत आहे. चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झालेला आहे. या ज्वारीच्या पिकापासून जनावरांना देखील चारा मिळत आहे.कुटासा चोहोट्टा बाजार ,गोपळखेड,गांधीग्राम व इतरही भागात ज्वारीची लागवड आहे.या भागात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीचे पीक घेतले आहे.विशेष म्हणजे, बहारदार व हिरवेगार उभे असलेले ज्वारीचे पीक येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.