Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट ,पोलिसांकडून कारवाई ऐवजी उडवाउडवीची उत्तरे


पाथर्डी प्रतिनिधी: ज्ञानेश कंठाळी

पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात काही दिवसापुर्वी चोरी करण्याचा हेतूने गावामध्ये चोर आले. चोरी करण्यासाठी घराच्या वाडग्यात शिरले. पण त्या घरातील एक महिला जागी झाली व तिने चोराला पाहून आरडाओरडा केल्याने चोर पळाले पण पळ काढत असताना चोराचा मोबाईल त्या ठिकाणी पडला, लोक जमा झाले. गावच्या पोलिस पाटलांनी पाथर्डी तालुका पोलिस स्टेशनला माहिती दिली असता पोलिसांची गाडी रात्री गावात आली व गावात विचारपूस करत चोरांचा मोबाईल घेवून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावचे सरपंच दादासाहेब कंठाळी, उपसरपंच राजेंद्र उदागे  तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ या घटनेसंबंधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गेले तिथे ठाणे अंमलदार साहेबाला भेटले त्यांना आमची तक्रार नोंदवून घ्या, असे ग्रामस्थ म्हणाले. परंतु त्यांनी तक्रार घेतली नाही ते म्हणाले की, पीएस आय संतोष मुटकुळे यांना भेटा. यानंतर ग्रामस्थ पी. आय मुटकुळे यांना भेटले असता त्यांनी सांगितले की, तुमच्या गावच्या या अगोदर तीन चार तक्रारी नोंदवलेल्या आहेत. त्या फाईल ओपन करू तसेच मोबाईल चौकशीसाठी वरीष्ठ कार्यलयाकडे पाठवलेला आहे. त्याचा तीन दिवसात अहवाल येईल अहवाल आला की आपण पुढील कारवाई करू असे सांगितले.

चार दिवसांनी ग्रामस्थ पुन्हा पाथर्डी पोलिस स्टेशनला गेले असता सुसरे बिटचे हवालदार दराडे यांनी सांगितले की, अहवाल अजून आला नाही. पुन्हा आठ दिवसांनी ग्रामस्थ गेले असता त्यांनी परत उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी पाथर्डी तालुक्याच्या लोक्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांनी पीआय मुटकुळे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, एक अज्ञात व्यक्तीचे नाव आमच्याकडे आले आहे. दोन दिवसात त्याला अटक करतो. पुन्हा चार दिवस झाले काहीच कारवाई नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क केला त्यांनी दोन वेळा कॉल केला तरीही काही कारवाई झाली नाही. चोराला न पकडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात सुसरे गावातील परीसरात चाळीस शेळ्या, तीन मोटासायकल चोरी गेल्या आहेत. पण पोलिस कारवई करत नसतील तर आम्ही जायचं कोणाकडे, पोलीस लोकप्रतिनिधीचे कोणी ऐकायला तयार नाहीत. म्हणून गावातील ग्रामस्थ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे उपोषण करणार आहेत. अशी माहीती ग्रामपंचायत सदस्य गणेश उदागे तसेच इतर ग्रामस्थ यांनी दिली आहे.