Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षाचा जनसंवाद मेळावा



बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षाचा जनसंवाद मेळावा मंगळवार दि.१९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या समोरील मैदानात आयोजित करण्यात आला आहे. उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश हिंगोली लोकसभा मतदार संघात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तीन वर्षानंतर खा. पाटील यांनी शिवसेनेशी गद्दारी करुन सेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. तसेच मराठा आरक्षणाचे मुद्यावरून राजीनामा दिल्याचे भासून मराठा समाजाची दिशाभूल केली. त्यामुळे उमरखेड महागाव

विधानसभा मतदारसंघात खा. हेमंत पाटील यांच्या विषयी मराठा समजत तीव्र नाराजी आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना (उबाठा) गटाला सुटली असून हदगावचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उमरखेड येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत. जनसंवाद सभेला खा. अरविंद सावंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे,

माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, संजय देशमुख, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ. श्रीकांत मुनगिनवार, संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या जनसंवाद सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, प्राचार्य मोहनराव मोरे, अड. बळीराम मुटकुळे, प्रशांत पत्तेवार, तालुका प्रमुख सतीश नाईक, राजेश खामनेकर, गजेंद्र ठाकरे, रविंद्र भारती यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.