Ticker

6/recent/ticker-posts

अंबड-घनसावंगी रोडवर दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या


तीर्थपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक साजिद अहमद यांची कामगिरी

अंबड प्रतिनिधी /ज्ञानेश्वर साळूंके

अंबड:छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी नोकरीस असलेले विकास बाबू राठोड (वय 28, रा. बोरगाव तांडा, ता. घनसावंगी) हे होळी आणि धुलीवंदनाच्या सणानिमित्त मोटारसायकलीवरून पत्नीसह गावी जात होते. काल बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास अंबड ते घनसावंगी रोडवरील मोहपुरी फाट्याजवळ त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या  तीन दरोडेखोरांनी अडविले. यावेळी दरोडेखोरांपैकी एकाने चाकू दाखवून गळा कापण्याची धमकी देत राठोड यांच्यापत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पर्स कापून घेतली. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि. 392, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व पोलीस ठाण्याना वायरलेसवर माहिती देऊन सतर्क करण्यात आले होते. 

दरम्यान, हे दरोडेखोर तीर्थपुरी हद्दीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साजिद अहमद यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत रात्रीतून संपूर्ण परिसर पिंजून काढला.अवघ्या चार तासातच या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना घनसावंगी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे गणेश विठ्ठल आहेर (वय 21, रा.भारडी ता. अंबड), कासम खबीर पठाण (वय 27, रा. सिद्धेश्वर पिंपळगाव ता. घनसावंगी) आणि संभाजी नाना नन्नावरे (वय 21, रा. रुई ता. अंबड) अशी आहेत.ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साजिद अहमद, पोलीस अंमलदार नारायण माळी आणि राजू जाटे आदींनी केली आहे.